Jewellery and cash worth Rs 1.5 lakh stolen from house cupboard
बार्शी विशेष : चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिने, घड्याळे, व रोख रक्कम मिळून सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना ८ ते १० ऑगस्टच्या दरम्यान घडली. याबाबत स्वाती दिनेश देशमुख रा. तुळजापूर रस्ता, बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांच्या पतीचे शहरातील कोष्टे गल्लीत ज्वेलरी शॉप आहे. ८ ऑगस्ट रोजी रात्री दुकानात झालेल्या विक्रीची रक्कम घराच्या बेडरुममधील कपाटात ठेवताना आत असलेले सोन्याचे दागिने, घड्याळे व रोख रक्कम कपाटात व्यवस्थित असल्याचे दिसले होते. परंतु १० ऑगस्ट रोजी रात्री दुकानातील विक्रीची रक्कम कपाटात ठेवताना सदर ऐवज दिसून आला नाही.
त्यामुळे कुणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन कपाटातील चार लेडीज घड्याळे, १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, १ तोळा वजनाचे सोन्याचे लेडिज ब्रेसलेट, ११ ग्रॅम वजनाचे सोन्याची चेन, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रोख चाळीस हजार रुपये असा १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची खात्री झाली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल डबडे करत आहेत.
