Citizens in Barshi were duped out of lakhs on the pretext of double the amount
बार्शी विशेष : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून बार्शीकरांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सेवानिवृत्त शिक्षक महादेव लक्ष्मण शिंदे (वय ५९) रा. शिक्षक कॉलनी, परांडा रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २००० च्या दरम्यान बार्शीतील जि.प. शिक्षक महादेव शिवाजी पलक, रा. सुभाषनगर, बार्शी (सध्या रा. कोल्हाड, ता. रोहा, जि. रायगड) यांचेशी ओळख होऊन मैत्री झाली. सेवेत असताना मार्केटींगच्या व्यवसायात पलक यांना जास्त पैसे मिळू लागल्यामुळे पुढे त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली.
सप्टेंबर २०२० मध्ये पलक यांनी सध्या मी VIATE कंपनीत काम करत असून, सदर कंपनीत ४७ हजार रुपये गुंतवल्यास, कंपनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन एका वर्षात पैसे डबल करुन देते असे आमिष दाखविले. त्यावर शिंदे यांनी स्वतःचे व पत्नीचे नावाने ९४ हजार रुपये त्यांना ऑनलाईन पाठविले.
पुढे पलक यांनी त्यांचेकडील मोबाईल अॅप्लीकेशन वरुन पैसे वाढत असल्याचे शिंदेंना दाखविले, व इतर लोकांचे अकाऊंट काढून दिल्यास ५ डॉलर मिळतील असे सांगितले, तसेच बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ३० डिसेंबर २०२० रोजी पलक व त्यांच्या पत्नीने कंपनीच्या नावाने मार्केटींगचा कार्यक्रमही केला.
महादेव शिंदेंनी पलक यांचेकडे ४३ व्यक्तींचे ४७ हजार प्रमाणे व ४ व्यक्तींचे १७ हजार प्रमाणे ४७ लोकांचे एकूण २० लाख ८९ हजार रुपये गुंतविले. मार्च २०२१ नंतर मोबाईल अॅप्लीकेशनमध्ये जमा होणारे डॉलर दिसणे बंद झाल्यामुळे त्याबद्दल विचारणा केली असता पुढे टाळाटाळ सुरु केली व आजपर्यंत पैसे परत दिले नाहीत असे फिर्यादीत नमूद केले आहे.
