कविता हृदयातून यावी लागते : हरिश्चंद्र पाटील

Admin
0

 

Poetry has to come from heart: Harishchandra Patil

Poetry has to come from heart: Harishchandra Patil


बार्शी विशेष : कवितेसाठी चिंतन, मनन नितांत गरजेचे असून कविता लिहिण्यासाठी तपश्चर्या गरजेची आहे, कविता सहजासहजी जमत नसते तर ती हृदयातून यावी लागते असे प्रतिपादन लेखक हरिश्चंद्र पाटील यांनी केले. येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने आयोजित ३२ व्या कालिदास महोत्सवात मेघदूत पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कालिदास मंडळाने आजपर्यंत अनेक नवोदितांना सन्मानित केले असून कालिदास मंडळाचा 'मेघदूत' पुरस्कार राज्यात नावलौकिक प्राप्त पुरस्कार असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले. 


यावेळी जयश्री कुलकर्णी अंबासकर यांना 'चिंब सुखाचे तळे' या काव्यसंग्रहासाठी आणि वैशाली भागवत यांना 'भावमंजिरी' या काव्यसंग्रहासाठी मेघदूत पुरस्काराने, तर ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था या संस्थेस समाजसेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी मातृभाषेतून उत्तम अभिव्यक्ती होत असते, कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना मांडता येतात, कविता माणसाला दुःख विसरायला लावते, कवी निसर्गाशी संवाद साधतो आणि अन्यायावर प्रहारही करतो असे मत व्यक्त केले. लेखक अंकुश गाजरे यांनी कालिदास मंडळाच्या कार्याचे कौतुक करत पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. पुरस्कार विजेत्या जयश्री कुलकर्णी अंबासकर, वैशाली भागवत, ओन्ली समाजसेवाचे अध्यक्ष राहुल वाणी व परीक्षक डॉ. रविराज फुरडे, सुमन चंद्रशेखर यांनी मनोगत व्यक्त केले. 


व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसह  म.सा.प. बार्शीचे अध्यक्ष पां. न. निपाणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी तर सूत्रसंचालन अर्चना देशपांडे पोळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुकुंदराज कुलकर्णी, प्रकाश गव्हाणे, दत्ता गोसावी, आबासाहेब घावटे, शिवानंद चंद्रशेखर, चन्नबसवेश्वर ढवण, हर्षद लोहार, प्रवीण पावले, संतोष जोशी यांनी परिश्रम घेतले.


यावेळी मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल, युवराज जगताप (प्रथम), सौ अंजली कांदे (व्दितीय), गौरी स्वामी (तृतीय), सारिका बोबे व पूजा ढगे (उत्तेजनार्थ) याप्रमाणे घोषित करण्यात आला.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)