Gold ornaments were stolen from a purse; Incident in Barshi market
बार्शी विशेष : कपड्यांची खरेदी आटोपून बाजारपेठेतून घरी परत आल्यानंतर, पर्सची चेन उघडी दिसल्यामुळे त्यामध्ये ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. आशा राजेंद्र कळसाईत (वय ५०) रा. सोन्या मारुती चौक, बार्शी यांनी शहर पोलिसात या घटनेची फिर्याद दिली आहे.
२ जुलै रोजी सायंकाळी ५ चे सुमारास विवाहीत मुलगी व तिची सासू यांच्यासह त्या भांडे गल्लीतील एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे मुलीचे बाळ आणि तिची पर्स होती.
खरेदी आटोपून सायंकाळी ६.३० चे सुमारास घरी परत आल्यावर त्यांनी पर्स मुलीच्या ताब्यात दिली, त्यावेळी पर्सची चेन उघडी दिसल्यामुळे मुलीने चेन कशी उघडी असे विचारत पर्स पाहिली असता, आत ठेवलेले दागिने दिसून आले नाहीत. कपडे खरेदी करताना दुकानातून कुणीतरी दागिने चोरुन नेले असावेत असे वाटल्यामुळे, त्या कपड्याच्या दुकानात जाऊन चौकशी केली, परंतु तेथेही काही माहिती मिळू शकली नाही.
त्यामुळे पर्समधील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ३ ग्रॅम वजनाची कर्णफुले व दोन सोन्याच्या नथ कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री पटल्यामुळे, ४२ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद कळसाईत यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
