Jewelry worth three lakhs were stolen in Agalgaon
बार्शी विशेष : घरातील लोक रात्री झोपी गेले असताना कटावणीने कुलूप उचकटून चोराने घरातील सुमारे तीन लाखाचे दागिने पळवले. शेजाऱ्याने फोन केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे रविवार ३० जूनच्या पहाटे घडली.
रामचंद्र साहेबराव गायकवाड (वय ५३) रा. आगळगाव, ता. बार्शी यांनी घटनेची फिर्याद बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. शनिवार २९ जूनच्या रात्री गायकवाड व त्यांचे कुटुंबीय जेवण करुन झोपी गेले होते. रात्री पावणेबाराचे सुमारास ते लघुशंकेला जाऊन आले त्यावेळी बेडरुम व शेजारील रुमला लावलेले कुलूप व्यवस्थित होते.
रात्री पावणेतीनच्या सुमारास शेजारी राहणारे बाळासाहेब नरहरी माने लघुशंकेसाठी उठले, त्यावेळी त्यांना शेजारील घराचे दरवाजे उघडे असलेले दिसले, आणि तेथून एक ३० ते ३५ वयाचा जाड, बुटका हाफ बर्मुडा घातलेला मुलगा बाहेर जाताना दिसला. तो सुजित असेल म्हणून त्यांनी सुजित नावाने हाक मारताच तो पळून गेला. ही गोष्ट मानेंनी गायकवाड यांच्या मुलाला फोन करुन सांगितली.
त्यावेळी गायकवाड यांनी घरात पाहणी केली तेव्हा, बेडरुम व शेजारील खोलीचे कुलूप तुटलेले दिसले व तेथे एक लोखंडी कटावणी पडलेली होती. बेडरुममधल्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेल्याचे दिसले.
रामचंद्र गायकवाड यांनी, ५ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे नेकलेस, ५ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, ५ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे लॉकेट आणि ३ भार वजनाचे चांदीचे लहान मुलांचे कडे, वाळे, पैंजण असे २ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद तालुका पोलिसात दिली असून, सपोउनि चंद्रकांत घोळवे पुढील तपास करत आहेत.
