Tree Conservation Committee successful in replanting banyan trees
बार्शी विशेष : मागील तीन दिवसांपूर्वी शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात उपळाई रोडच्या टेलीफोन नगरातील तीस वर्षाचे एक वडाचे झाड उन्मळून पडले होते.
वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना याची माहिती मिळताच ते झाड जगवता येईल का यादृष्टीने त्यांनी विविध तज्ञांचे मार्गदर्शन घेतले.
वृक्ष पडलेल्या भागातील जमिनीच्या कठीणपणामुळे, दुसऱ्या ठिकाणी त्याचे पुनर्रोपण करण्याचे ठरवून, त्यासाठी योग्य जागा निवडण्यात आली. परंतु त्यामुळे तो आवाढव्य वटवृक्ष तेथे नेऊन त्याचे पुनर्रोपण करण्याचे एक मोठे आव्हान समितीपुढे उभे राहिले.
याचवेळी पैकेकर कन्स्ट्रक्शनचे प्रशांत पैककर, मंदार कुलकर्णी, बार्शी नगरपरिषदेतील कारकर पाटील, आठवले हे मदतीसाठी धावून आले. आणि एक दिवसाच्या अखंड परिश्रमानंतर त्याचे पुनर्रोपण करुन वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला वसुंधरेचे एक मूल वाचवण्यात वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना यश आले.
या कार्याबद्दल वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य आणि पुनर्रोपण कार्यात सहभाग नोंदवलेल्या सर्वांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.