An employee of V. K. Mart commits financial fraud; Case filed
बार्शी विशेष : येथील भवानी पेठेत असलेल्या व्ही. के. मार्टमध्ये आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याने संगणकातील सॉफ्टवेअरमध्ये चलाखी करुन आस्थापनेची ३१ लाख २९ हजार ४४३ रूपयांची फसवणूक केल्याचे उघड झाल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी युवराज सोपल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत गौरीशंकर सोनवणे, रा.वाणी प्लॉट बार्शी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शीतील पाच व्यावसायिकांनी २०१८ मध्ये भागीदारीत व्ही. के. मार्ट नावाने व्यवसाय सुरु केला. या व्यवसायासाठी त्यांनी पुणेस्थित कंपनीचे सॉफ्टवेअर स्थापित केले. हे सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी व आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी त्यांना कुशल व्यक्तीची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी संकेत सोनवणे याला सप्टेंबर २०१८ पासून नियुक्त केले होते, त्याच्याकडे सॉफ्टवेअरचे युजर आयडी व पासवर्ड होते. दैनंदिन व्यवहाराची लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडे असायची.
सदर सॉफ्टवेअर अद्ययावत करणे गरजेचे झाल्यामुळे मॉलच्या संचालकांनी कंपनीच्या तज्ञाला पाचारण केले. त्यांनी पडताळणी केली तेव्हा सॉफ्टवेअरमधील दैनंदिन मूळ विक्रीचे आकडे बदलून, जमा रकमेच्या आकड्यांत बदल करुन अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले. संचालकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा सोनवणे काही रक्कम खिशात ठेवताना दिसून आले.
४ जून ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला असून, उपनिरिक्षक महेश गळगटे पुढील तपास करत आहेत.