The policeman who went to resolve the prisoner's quarrel shocks
बार्शी विशेष : बार्शीच्या उपकारागृहात आपसात सुरु असलेले कैद्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेल्यावर धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार पोकॉ सूरज लियाकत मुलाणी (वय २९) रा. कुर्डुवाडी, ता. माढा (सध्या नेमणूक पांगरी पोलिस ठाणे) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
२५ जानेवारी रोजी बार्शी येथील उपकारागृहात लॉकअप गार्ड म्हणून मुलाणी कर्तव्यावर असताना, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बॅरेक क्र. १ मधून आरडाओरडा गोंधळ ऐकू आल्यामुळे सहकारी गार्ड पोना भांगे यांच्यासह बॅरेकमध्ये गेले.
त्यावेळी एक न्यायाधिनबंदी आरडाओरडा करत इतर आरोपींना शिवीगाळी करत असल्याचे दिसले. त्याने रागाच्या भरात दुसऱ्या आरोपीला धरुन मारहाण करण्यास सुरुवात करताच मुलाणी व भांगे यांनी भांडण थांबविले. तेव्हा तू बाजूला सरक, तुझा संबंध नाही, आमच्यामध्ये पडू नको असे म्हणत त्याने मुलाणी यांना धक्काबुक्की करत गच्ची धरुन भिंतीवर दाबून धरले. त्यावेळी भांगे व इतर आरोपींनी त्याला बाजूला नेले. सदर आरोपीचे नाव नितीन अनिल विधाते (वय ३६) रा. आगळगांव, ता. बार्शी असल्याचे चौकशीत समजले असे मुलाणी यांनी फिर्यादी जबाबात नमूद केले आहे.
अधिक्षक दुय्यम कारागृह, बार्शी यांचे आदेशानुसार मुलाणी यांनी आरोपीविरोधात धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दिली असून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
