A truck loaded with cement was stolen from the petrol pump
बार्शी विशेष : सिमेंट पोती भरुन पेट्रोल पंपावर लावलेला दहा चाकी ट्रक चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. सिमेंट व ट्रक मिळून अंदाजे ३ लाखाचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद ट्रक चालक किसन बळवंत पाटील (वय ५७) रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल लड्डा यांच्या सिमेंट एजन्सीचे गोदाम लातूर रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाच्या बाजूस असून, त्यांच्या ट्रकवर ते चालक म्हणून मागील तीन वर्षापासून काम करत आहेत.
कुर्डुवाडी येथे सिमेंट पोहोच करण्यासाठी २४ जानेवारी रोजी सकाळी लवकर निघायचे असल्यामुळे, अल्ट्राटेक कंपनीचे ५० किलो वजनाचे ३४० सिमेंट पोते भरलेला अशोक लेलँड कंपनीचा दहा चाकी ट्रक (क्र. एमएच-१३-आर-४१९१) २३ जानेवारी रोजी रात्री साडेसातचे सुमारास लातूर रस्त्यावरील नायरा पंपावर लावून पाटील गावाकडील घरी गेले.
२४ जानेवारी रोजी सकाळी कुर्डुवाडी येथे जाण्यासाठी पंपावर ट्रक लावलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा ट्रक तेथे दिसून आला नाही. पंपावरील सीसीटीव्हीचे रेकॉर्ड तपासून पाहिले तेव्हा २३ जानेवारीच्या रात्री साडेअकराच्या सुमारास एक इसम ट्रक चोरुन नेताना दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल चौगुले करत आहेत.
