हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करुन ७० हजार रुपये आणि अंगठी काढून घेतली

Admin
0

 

Four persons beat up the hotelier and took away the ring and 70 thousand

बार्शी विशेष : जेवण उधार देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन, हॉटेल व्यावसायिकाला चौघाजणांनी मारहाण करुन हातातील सोन्याची अंगठी आणि गल्ल्यातील सत्तर हजार रुपये काढून घेतल्याची घटना बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे घडली.

या घटनेची फिर्याद तानाजी दत्तात्रय साळुंखे (वय २८) रा. भातंबरे, ता. बार्शी यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीचे भातंबरे-बोरगांव रस्त्यावर तुकाई हॉटेल असून, सुधीर धर्मे, शहाजी सोनटक्के, सुनिल संकपाळ व दत्ता धर्मे  (सर्व रा. झरेगांव, ता. बार्शी) हे तेथे जेवणासाठी नेहमी येत असल्याने त्यांची ओळख होती.

पंधरा दिवासापूर्वी सुधीर धर्मे यास फिर्यादीने जेवण उधार देण्यास नकार दिला होता. त्याचा राग मनात धरुन, दि. ७ मार्च रोजी दुपारी ३ चे दरम्यान त्या चौघांनी हॉटेलमध्ये येवून, तू याच्यासोबत भांडण का केले, त्याला जेवण उधार का दिले नाही, सुधीर धर्मे यांनी तुला मारण्याची  आम्हाला सुपारी दिली आहे, असे म्हणून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन, त्याच्या हातातील एक तोळा सोन्याची अंगठी व गल्ल्यात ठेवलेले बचत गटाचे सत्तर हजार रुपये काढून घेतले. त्यांना धक्का देऊन फिर्यादी पळत जाऊन काही अंतरावर जाऊन थांबले असता दगडे फेकून मारुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीवर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, वैराग पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)