दोन दुचाकी चोरांना अटक, २ लाखांच्या ९ दुचाकी जप्त; बार्शी शहर पोलिसांची कामगिरी

Admin
0

 

Two bike thieves arrested, 9 bikes worth 2 lakh seized; Performance of Barshi City Police

'बार्शी विशेष इम्पॅक्ट'

बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीच्या ९ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. 

बार्शी शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार नियमितपणे घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर कित्येक दिवसांनंतर बार्शी पोलिसांकडून प्रथमच दुचाकी चोरांना अटक करून दुचाकी ताब्यात घेण्यात आल्याची ही बातमी बार्शीकरांना नक्कीच दिलासा देणारी आहे. 'बार्शी विशेष' सातत्याने दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांच्या बातम्या प्रसिध्द करत आहे.

यासंदर्भातील माहिती अशी की, अक्षर प्रभाकर चोरमुले रा. पाटील चाळ, बार्शी यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दि. ३ ते ४ फेब्रुवारीच्या दरम्यान चोरीला गेली होती, व दि. ५ फेब्रुवारी रोजी त्या चोरीची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. 

शहर पोलिस सदर गुन्ह्याचा तपास करत असताना, चोराने मोटरसायकल घेऊन गेलेल्या दिशेच्या रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधील व्यक्तीची माहिती मिळविली. त्यातील निष्पन्न आरोपींची माहिती काढून त्याच्यावर पाळत ठेवून, सदर आरोपी दिसल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळताच, त्यांचा पाठलाग करून अजय शिवाजी पवार (वय २१) रा. आगळगांव (सध्या बेलगांव, ता. बार्शी) व सूरज शिवाजी पवार (वय २६) रा. जगदाळे वस्ती, पाटील गल्ली, बेलगांव, ता. बार्शी यांना चोरलेल्या मोटरसायकलसह पकडले. सदर आरोपींना दि. ५ फेब्रुवारी रोजी अटक करून १३ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे.

बार्शी शहरातून व इतर ठिकाणाहून अशाच प्रकारे दुचाकी चोरल्याचे त्यांनी तपासादरम्यान सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून २ स्प्लेंडर मोटरसायकल, ६ हिरो होंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल व १ टीव्हीएस वेगो स्कूटी अशा २ लाख रुपये किंमतीच्या एकूण ९ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. अण्णासाहेब मांजरे, सपोनि सुधीर तोरडमल, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ चौगुले, पोना मनिष पवार, वैभव ठेंगल, पोकॉ अंकुश जाधव, ज्ञानेश्वर घोंगडे, रविकांत लगदिवे, अर्जुन गोसावी, सचिन देशमुख, अविनाश पवार यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)