| Barshi Vishesh Digital Newspaper 16 April 2026 |
बार्शी विशेष : बार्शी शहर 'ग्रामीण' (Rural) आहे की 'शहर' (Urban) ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारने मार्च २०२६ पासून घरगुती गॅस सिलेंडर (LPG) नोंदणी करण्यासाठी शहरी भागासाठी २५ दिवस तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांचा प्रतिक्षा कालावधी लागू केला आहे.
मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना 'बीपीसीएल' (भारत गॅस) ने बार्शी शहरासाठी कोणते निकष लागू केले आहेत हे समजायला मार्ग नाही. कारण सिलेंडरची नोंदणी करताना बार्शी शहरातील गॅस ग्राहकांना ४५ दिवसानंतरची तारीख दर्शविली जाते, त्यामुळे ग्राहकांची अडचण तर होतच आहे, सोबतच आपण बार्शी शहरात राहतो की ग्रामीण भागात याबाबतही संभ्रम निर्माण होत आहे.
यावर ग्राहकांनी काय करायचे?
- अॅपद्वारे ऑनलाईन सिलेंडर नोंदणी करताना ४५ दिवसानंतर बुकींग करता येईल असा संदेश दिसतो, फोनद्वारे प्रयत्न केल्यास असाच एसएमएस येतो, त्यामुळे सिलेंडरची नोंदणी होत नाही.
- 'बीपीसीएल' अॅपमध्ये संपर्कासाठी दूरध्वनी आणि ईमेल असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी ग्राहक सेवेच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास 'आपण डायल केलेल्या नंबरशी संपर्क होत नाही' हे उत्तर ऐकू येते. आणि ईमेल पाठविल्यास कंपनीकडून उत्तर दिले जात नाही.
- शहरातील मोहिते गॅस एजन्सीचा लॅंडलाईन बंद आहे, दुसऱ्या क्रमांकावर कॉल केल्यास ते कॉल घेत नाहीत.
- याप्रकारे ग्राहकांची सर्व बाजूने अडवणूक होत असेल तर ग्राहकांनी काय करायचे ? त्यांना गॅस सिलेंडर कसे मिळणार हा प्रश्न आहे.
लाखाहून अधिक लोकसंख्या आणि 'अ' वर्ग नगरपरिषद असलेले बार्शी शहर (Urben) की रुरल (Rural) याचा खुलासा आता प्रशासनानेच करावा अशी मागणी होत आहे.
बार्शी शहरातील गॅस ग्राहकांना २५ दिवसानंतर सिलेंडर देण्याबाबत प्रशासन 'बीपीसीएल' ला आदेश देईल का, किंवा 'बीपीसीएल'ने लागू केलेला ४५ दिवसांचा निर्णय मान्य करुन बार्शी शहराला 'ग्रामीण'चा दर्जा आणि सोयी-सवलतीचे निकष लागू करेल याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.
