![]() |
बार्शी विशेष : घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून भरदिवसा घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना बार्शीतील संभाजीनगर येथे घडली.
सिध्देश्वर अभिमन्यु मुळे (वय ४२) रा. संभाजीनगर, स्टेशनरोड, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. दि. १२ जानेवारी रोजी दुपारी बाराचे सुमारास त्यांची पत्नी व वहिनी घराचे आतील दारास कुलूप लावून तसेच बाहेरील मुख्य दरवाज्याला कडी घालून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
त्यानंतर दुपारी पाऊणेएकचे सुमारास त्यांच्या वहिनी जेवण करण्यासाठी घरी आल्या तेव्हा त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला, म्हणून त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. ही गोष्ट त्यांनी फोन करुन सिध्देश्वर यांना सांगितली.
फोनवर ही माहिती समजताच सिध्देश्वर यांनी तातडीने घरी येऊन पाहिले तेव्हा, चोरांनी घराच्या आतील दारांची दोन्ही कुलूपे तोडून, सामान अस्ताव्यस्त फेकून, रुममधील लोखंडी कपाटातील सोन्याची अंगठी, बदाम,चांदीचे पैंजण, फुलपात्र, नाणे आणि रोख रक्कम २६ हजार असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले.
