![]() |
बार्शी विशेष : बार्शीच्या कारखानदाराचा माल नाशिकला पोहोच केल्यानंतर, टेंपोतील लॉकरमध्ये ठेवलेल्या रकमेपैकी ९२ हजार रुपये काढून चालक पसार झाल्याची घटना उघडकीस आली.
गणेश अनंत अवधूत (वय ४२) रा. पंकजनगर, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. अवधूत यांच्या मालवाहतूक टेंपोवर मनोज चंद्रकांत पवार, रा. सुभाषनगर, बार्शी हा चालक म्हणून कामास होता.
दि. ८ जानेवारी रोजी बार्शीतील औद्योगिक वसाहत क्र. २ मधील कारखानदाराचे प्लॅस्टिक कॅन पिंपळनेर, नाशिक येथील व्यापाऱ्यास पोहोच करण्याचे भाडे त्यांना मिळाले.
लांबचा पल्ला असल्यामुळे अवधूत व चालक पवार या दोघांनी टेंपो चालवत पिंपळनेर, नाशिक येथे माल पोहोच केला. त्या व्यापाऱ्याने मालाची दिलेली रोख रक्कम २ लाख २० रुपये घेऊन, येताना जळगांव येथून कर्नाटकातील बागलकोट येथे पाईप पोहोचविण्याचे भाडे मिळाल्यामुळे तेथून पाईप भरून दि. ११ जानेवारी रोजी पहाटे ४ चे सुमारास बार्शीतील भिसे प्लॉट येथे ते दोघे आले, त्यावेळी मनोज टेंपो चालवत होता.
पहाटेची वेळ असल्याने दिवस उगवल्यावर घरी जाऊ म्हणून ते दोघे टेंपोतच झोपी गेले. झोपण्यापूर्वी मालाची रक्कम २ लाख २० रुपये टेंपोमधील लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवलेले होती व ते मनोज यांस माहित होते.
सकाळी ६ वाजता अवधूत झोपेतून उठल्यानंतर मनोज टेंपोमध्ये दिसला नाही, तसेच आजूबाजूला बघूनही दिसला नाही. त्यामुळे अवधूत यांनी टेंपोमधील लॉकरमध्ये ठेवलेले पैसे मोजून पाहिले असता, त्यामध्ये ९२ हजार रुपये कमी असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी मनोज पवार याचा बार्शी शहर व इतरत्र शोध घेतला तरीही तो सापडला नाही.
त्यामुळे मनोज पवारने पैसे चोरले अशी खात्री पटल्यामुळे अवधूत यांनी त्याच्याविरुध्द बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
