दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने सोन्याचे गंठण पळविले

Admin
0

 

The golden ganthan was stolen on the pretext of polishing the jewelry

The golden ganthan was stolen on the pretext of polishing the jewelry

बार्शी विशेष : सोन्याचे दागिने पॉलिश करुन देतो म्हणत, हातचलाखीने सोन्याचे गंठण पळविल्याची घटना बार्शीतील बालाजी कॉलनी येथे घडली.

राजनंदिनी विजयकुमार देशमुख (वय २८) रा. बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. दि. २९ डिसेंबर २०२२ रोजी घरामध्ये त्या व त्यांची आई अशा दोघीच असताना, दुपारी बाराच्या सुमाराला कुणीतरी दरवाजा वाजविला म्हणून त्यांनी दार उघडून बघितले. तेव्हा एका अनोळखी इसमाने त्यांना कार्ड देऊन मी उजाला कंपनीचा सेल्समन असून, तांब्याची भांडी पॉलिश करुन देतो असे सांगितले.

तेव्हा त्यांनी दिलेला एक पूजेचा छोटा तांब्या त्याने पॉलिश करुन दिला. तेवढ्यात अजून एक काळे जर्किन घातलेला इसम तेथे आला. तांब्या पॉलिश करुन दिलेल्या इसमाने सोन्या चांदीचे दागिनेही पॉलिश करुन देतो म्हणून त्यांना वेगवेगळ्या पावडर दाखविल्या.

त्यांच्या गळ्यात असलेले गंठण पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने घेवून, गरम पाणी व स्टीलचा डबा  मागितला. तसेच पिण्यासाठी मागून घेतलेल्या पाण्यापैकी थोडे पाणी स्टीलच्या डब्यात टाकले आणि थोड्याच वेळात गंठण पॉलिश होईल असे सांगून स्टीलचा डबा त्यांच्याकडे देवून ते दोघेजण मोटरसायकलवर बसून निघून गेले.

थोड्या वेळानंतर त्यांनी स्टीलच्या डबा पाहिला असता त्यामध्ये त्यांचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण (अं. किंमत ४२५०० रुपये) नसल्याचे दिसून आले. सदर फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)