बार्शीतून महिला प्रवाश्याचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या ३ महिलांना अटक

Admin
0
https://www.barshivishesh.in
3 women arrested for stealing gold ornaments of female passenger from Barshi


२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; बार्शी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

बार्शी विशेष : बार्शी बस स्थानकातील बसमध्ये चढत असताना, महिला प्रवाश्याचे चोरीस गेलेले २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेचा मुद्देमाल अवघ्या काही तासांतच हस्तगत करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. 

मूळच्या ईडा अंतरगांव (ता. भुम) व सद्या मिरज येथील रहिवासी, प्रियंका अंकुश थाटे या मिरज येथे जाण्यासाठी औरंगाबाद-इचलकरंजी बसमध्ये चढत असतांना, त्यांच्याकडे असलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ चे सुमारास घडली होती. त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला.

बार्शी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असता, तीन महिलांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पध्दतीने अधिक तपास करुन, बार्शी-सोलापूर बसने सोलापूरकडे गेलेल्या या महिलांचा पाठलाग करुन, त्यांना नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले व  त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल काही तासांतच हस्तगत केला. 

पद्मिनी अनंत सकट (वय ५०), नुरी रंजित उपाडे (वय ४०) व नर्मदाबाई नेरू उपादे उर्फ माधुरी जॅकी पाटील (वय ३५) (सर्व रा. धक्का तांडा, शहाबाद, ता.चितापूर, जि. गुलबर्गा कर्नाटक राज्य) अशी अटक केलेल्या तीन महिलांची नांवे आहेत. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना  दि. १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार, स.पो. फौजदार अजित वरपे, अरुण माळी, सिंधू देशमुख, वैभव ठेंगल, मनिष पवार, संगाप्पा मुळे, रवी लगदिवे, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, अविनाश पवार यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)