![]() |
| A tipper parked at a petrol pump in Barshi was stolen |
बार्शी : १० लाख रुपये किंमतीचा टिपर बार्शी येथील पेट्रोल पंपावरुन चोरीस गेल्याची घटना घडली.
याबाबतची फिर्याद रामा कमलाकर ठोंगे (वय ४५) रा. जवळा (नि.), ता. परांडा, जि. उस्मानाबाद (सध्या रा. हनुमान टेकडी, उपळाई ठोंगे, ता. बार्शी) यांनी दिली आहे. त्यांनी शेतीच्या जोडधंद्यासाठी टाटा टिपर क्र. एमएच-३४-एबी-८७४९ घेतला असून त्याचा व्यवहार मावस भाऊ दशरथ हरिश्चंद्र टेकाळे, रा. भोयरे, ता. बार्शी हा पहातो. सदर टिपरवर सिध्देश्वर मिरगणे, रा. मांडेगांव, ता. बार्शी हा चालक म्हणून कामास आहे.
सदर टिपर काम झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी लातूर रोडवरील इस्सार पेट्रोल पंपावर लावतात. दिवसभराच्या कामानंतर दि. ३ जून रोजी चालक मिरगणे याने नेहमीप्रमाणे टिपर पेट्रोल पंपावर लाऊन तो त्याचे घरी निघून गेला. दोन दिवस टिपरला काम नसल्याने चालक टिपरकडे गेला नाही.
दि. ५ जून रोजी टिपरला वाहतूकीचे काम असल्यामुळे चालक सिध्देश्वर मिरगणे व राजेश टेकाळे असे दोघेजण सकाळी आठचे सुमारास टिपरकडे गेले असता चालकाने लावलेल्या जागेवर टिपर दिसून आला नाही. तेव्हापासून आजपर्यंत चौकशी करुन व शोध घेऊनही टिपर न सापडल्याने दि. ८ जून रोजी टिपर चोरीस गेल्याची फिर्याद रामा ठोंगे यांनी दिली आहे. त्यावरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
