हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; बार्शीत गुन्हा दाखल (AI Image)
बार्शी विशेष : लग्नात मानपान झाला नाही आणि माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिला प्रार्थना शुभम मोरे (वय २६) रा. इसबावी, ता. पंढरपूर (सध्या रा. धस पिंपळगांव रोड, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रार्थना मोरे यांचा विवाह १ मे २०२४ रोजी शुभम सुरेश मोरे (रा. इसबावी, ता. पंढरपूर) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर महिनाभर सर्व काही ठीक चालले, मात्र २५ जून २०२४ पासून सासरच्या मंडळींनी अपमान करुन छळ करायला सुरुवात केली. "तुझ्या आई-वडिलांनी लग्नात योग्य मानपान केला नाही, ए.सी. दिला नाही, रुखवताच्या वस्तू चांगल्या दिल्या नाहीत," असे म्हणत सासू सुषमा मोरे आणि पती शुभम यांनी तिला टोमणे मारण्यास व अपमानित करण्यास सुरुवात केली.
५ जानेवारी २०२६ रोजी नणंद श्रद्धा चौगुले हिने घरी येऊन "माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, तरच इथे राहा," असे बजावले. पैसे न आणल्यामुळे विवाहितेला उपाशी पोटी ठेवण्यात आले. तसेच ऑक्टोबर २०२५ पासून पतीने तिच्याशी वैवाहिक संबंध तोडले असून डिसेंबरमध्ये तिचे सर्व दागिनेही काढून घेतले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पीडितेच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र सासरच्या मंडळींनी त्यांनाही शिवीगाळ करून हाकलून दिले. अखेर छळाला कंटाळून पीडिता १३ फेब्रुवारी २०२६ पासून माहेरी राहत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती शुभम मोरे, सासरे सुरेश मोरे, सासू सुषमा मोरे आणि नणंद श्रद्धा चौगुले यांच्यावर गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार शैलेश चौगुले पुढील तपास करत आहेत.
