| Barshi Vishesh Digital Newspaper |
बार्शी विशेष : बार्शी शहरात सध्या दहा-वीस रुपयांच्या नाण्यांची आणि नोटांची टंचाई जाणवत आहे. युपीआय पेमेंटमध्ये ही अडचण येत नसली तरीही, बाजारपेठेत सगळेच व्यवहार काही ऑनलाईन पध्दतीने होत नाहीत. अशावेळी रोखीने व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना उर्वरीत रक्कम परत देण्यासाठी व्यापाऱ्यांना नाण्यांची आवश्यकता भासते.
दहा-वीस रुपयांच्या नोटा थोड्या प्रमाणात मिळाल्या तरी बंडलमधील बऱ्याच नोटा खराब निघतात. त्यामुळे नोटाऐवजी नाणीच द्या असा ग्राहकांचाही आग्रह असतो.
बार्शीतील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मात्र करंट अकाऊंट नसल्याच्या कारणावरुन नाण्यांची मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांची अडवणूक केली जात आहे. बचत खाते असले तरीही नाणी देण्यास नकार दिला जातो अशा तक्रारी व्यापारी वर्गातून ऐकायला मिळत आहेत.
या अडवणूकीबाबत व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सर्व व्यापाऱ्यांना नाणी दिली जावीत अशी मागणी होत आहे.
