प्लास्टिक दुकानातील मटका धंद्यावर निर्भया पथकाची धाड

0


matka-raid-shivansh-plastic-shop-barshi
मटका व्यवसायावर निर्भया पथकाची धाड

बार्शी विशेष : येथील लातूर रोडवरील दूधवाला चौक भागात असलेल्या शिवांश प्लास्टिक दुकानात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पाडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ सुभाष कवठाळकर (वय ५२) रा. वाणी प्लॉट, बार्शी आणि मुख्य मालक लखन सुभाष विघ्ने, रा. खुरपे बोळ, बार्शी यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


बार्शीतील दूधवाला चौक परिसरातील एका दुकानात कल्याण आणि मुंबई नावाचा मटका बेकायदेशीरपणे खेळवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निर्भया पथकाने पंचांसह शिवांश प्लास्टिक दुकानात छापा टाकला. यावेळी आरोपी सोमनाथ कवठाळकर हा लोकांकडून पैसे घेऊन आकड्यांवर पैज लावत असताना रंगेहात पकडला गेला. 


पोलिसांनी त्याच्याकडून १६ हजार ३०० रुपयांची रोकड, सॅमसंग आणि विवो कंपनीचे दोन महागडे मोबाईल फोन, गणकयंत्र आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. चौकशीत त्याने हा जुगार लखन विघ्ने याच्या सांगण्यावरून चालवत असल्याची कबुली दिली. 


सदर कारवाई निर्भाय पथकाचे हवालदार बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे, नम्रता गटकुळ, चालक भाऊसाहेब महानोर यांनी केली. पुढील तपास हवालदार प्रवीण साठे करत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)