Barshi Vishesh Digital Newspaper
बार्शी विशेष : सुभाष नगर भागातील हिरेमठ हॉस्पिटल जवळ असलेल्या त्रिमूर्ती पान शॉपवर पोलिसांनी छापा टाकून १३ हजार ३८२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बार्शी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पान शॉप चालक संकेत भगवान लांडगे (वय ३२) रा. सुभाष नगर, बार्शी याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे दुकान सील करण्यात आले आहे.
या पान शॉपमध्ये पंधरापेक्षा अधिक नमुन्यांच्या प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाले यांचा साठा करून शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास हवालदार गणेश पोफळे करत आहेत.
