| बार्शीतील वृद्ध महिलेच्या हत्याप्रकरणी पोलिस तपास सुरु (AI Image) |
बार्शी विशेष : शेअर मार्केटमध्ये (Share Market) झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी एका तरुणाने आपल्याच परिचयातील ७३ वर्षीय वृद्धेची विष देऊन आणि गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी शहरात उघडकीस आली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
याबाबत शशिकांत किसन वायकुळे (वय ६४) रा. उपळाई रोड, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची चुलत बहीण गंगुबाई कालीदास गडदे (वय ७३) रा. हांडे गल्ली, बार्शी या २५ मार्च २०२६ पासून बेपत्ता होत्या. त्या कोणालाही न सांगता घराला कुलूप लावून निघून गेल्याने सुरुवातीला २७ मार्च रोजी 'मिसिंग' (Missing) तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये २५ मार्च रोजी गंगुबाई या भाडेकरू चांगदेव पाठोपाठ पवार बिल्डींगमध्ये गेलेल्या दिसल्या, परंतु पुन्हा बाहेर आल्याचे दिसल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय चांगदेव गोवर्धन पाटील याच्यावर बळावला.
आरोपी चांगदेव पाटील, रा. हत्तीज, ता. बार्शी, (सध्या रा. पवार बिल्डींग, डॉ. खामकर हॉस्पीटलवरील दुसरा मजला, बार्शी) हा शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पैशांच्या विवंचनेत होता. त्याला पैशांची गरज असल्याने गंगुबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने मिळवण्याच्या उद्देशाने त्याने त्यांना आपल्या घरी बोलावून, त्यांना लिंबू सरबतातून गुंगीच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. आणि त्यानंतर टॉवेलने नाक दाबून त्यांची हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह एका काळपट रंगाच्या ठिक्यात भरला आणि स्वतःच्या ह्युंदाई वेरना (Hyundai Verna) कारमधून (क्र. MH 20 CS 8937) नेऊन त्याची विल्हेवाट लावली. इतकेच नव्हे तर, संशय येऊ नये यासाठी फिर्यादीसोबत स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीही आला होता. तसेच त्याने २६ मार्च रोजी खामकर हॉस्पीटलमध्ये जाऊन क्रेडिट कार्डची पिशवी हरविल्याचे कारण सांगून तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याच्या निमित्ताने सीसीटीव्ही फुटेजचा डेटाही डिलीट केला.
बार्शी शहर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी अंकुश कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.
