Laborer beaten with a stick over three rupees
बार्शी विशेष : तीन रुपयांच्या कारणांवरून एका मजुराला लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार, १ मार्च २०२६ रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास तानाजी चौक परिसरातील एका दारूच्या दुकानासमोरील टपरीजवळ घडली. या प्रकरणी गणेश चंद्रकांत गायकवाड (वय २३) रा. जैन मंदिराजवळ, कुर्डुवाडी रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, गणेश यांचा मित्र शुभम आणि एका पानटपरी चालकामध्ये ३ रुपयांच्या पापडाच्या पैशांवरून वाद सुरू होता. त्यामध्ये गणेश यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, तिथे उपस्थित असलेल्या एका इसमाने त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्यानंतर दुकानातील इतर तीन कामगारांनी लाकडी काठ्यांनी गणेश यांच्या दोन्ही हातांवर, पायांवर आणि कमरेवर काठीने मारहाण केली. जखमी होऊन खाली पडल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले.
जखमी गणेश यांनी ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचार घेतल्यानंतर पोलिसांत धाव घेतली. बार्शी शहर पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३५२, ३(५), ११८(१) आणि ११५(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बी. एस. सोनमाळी करत आहेत.
