![]() |
| Deportation of obedient Barshi city police |
बार्शी विशेष : सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेले असतानाही, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय बार्शी शहरात वावरणाऱ्या एका इसमाला बार्शी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ओंकार ऊर्फ तुळ्या किशन पेठाडे (वय २३) रा. टिळक चौक, सुभाषनगर, बार्शी असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशानुसार ओंकार पेठाडे याला २४ नोव्हेंबर २०२५ पासून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.२० च्या सुमारास तो बार्शीतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.
गुन्हे अन्वेषण पथकाने तातडीने तेथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कबूल केले. हद्दपारीच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोकॉ अविनाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

