| जवानाच्या शेतातील पीव्हीसी पाईपची चोरी (AI Image) |
बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील चारे येथील लष्करी सेवेत असलेल्या जवानाच्या शेतातून अज्ञात चोरट्याने २१ हजार रुपये किंमतीचे पीव्हीसी पाईप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रताप मोहन जगदाळे (वय ३७) मूळ रा. चारे, (सध्या रा. कासारवाडी रोड, पडवळ हॉस्पीटलजवळ, बार्शी) हे भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत आहेत. चारे येथे असलेली शेती त्यांचे आई-वडील गावी येऊन जाऊन करतात. चारे तलावापासून शेतात पाईपलाईन करण्यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वी जैन कंपनीचे ३ इंची १८० पाईप खरेदी करून शेतातील घराबाहेर ठेवले होते. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील मोहन जगदाळे यांनी पाईप मोजले त्यावेळी ते बरोबर होते.
२३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वडील पुन्हा शेतात गेले असता, त्यांना पाईपची संख्या कमी असल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने रजेवर आलेल्या प्रताप जगदाळे यांना याची माहिती दिली. प्रताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एकूण १८० पाईपांपैकी ६० पाईप गायब असल्याचे दिसून आले. परिसरात व गावात शोध घेऊनही पाईप मिळून आले नाहीत.
अखेर २१ हजार रुपये किंमतीचे पाईप चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर प्रताप जगदाळे यांनी २४ मार्च रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अभय उंद्रे करत आहेत.
