| बार्शीत दुकानासमोरून कपड्यांच्या पार्सलची चोरी |
बार्शी विशेष : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नवी चाटे गल्लीतील 'गीता लेडीज वेअर' या दुकानासमोरून अज्ञात चोरट्याने ७७,२१५ रुपये किमतीचे तयार कपड्यांचे पार्सल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन नामदेव रंगदाळ (वय ४४) रा. नवी चाटे गल्ली, बार्शी यांचे तयार कपडे विक्रीचे दुकान आहे. मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी एकचे सुमारास मुंबईहून मागविलेले लेडीज कपड्यांच्या मालाचे पार्सल दुकानात आले होते. दुकानात ग्राहकांची गर्दी असल्याने सदर पार्सल दुकानाच्या दरवाजाजवळ ठेवले होते.
दुपारी तीनचे सुमारास फिर्यादी जेवणासाठी घरी जाण्यास निघाले असता, दरवाजाजवळ ठेवलेला डाग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत मोठा भाऊ व आई तसेच शेजारील आणि परिसरांतील दुकानदारांकडे चौकशी केली, मात्र काहीच थांगपत्ता लागला नाही. पार्सल चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी २९ मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
चोरीस गेलेल्या पार्सलमध्ये कंफर्ट कंपनीचे १४३ लेडीज गाऊन होते, त्याची किंमत ७७ हजार २१५ रुपये आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस शिपाई इसमिया बहिरे करत असून, भर बाजारपेठेत झालेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
