Habitual Criminal Gang Externed from Barshi for One Year
बार्शी विशेष : सोलापूर जिल्ह्यात तसेच बार्शी तालुक्यात दहशत माजवून खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून जबर दुखापत पोहोचवणे, महिलेची छेडछाड करणे, जातीवाचक शिवीगाळी करणे, शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या बार्शीतील सराईत गुन्हेगार टोळीला सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
सदर टोळीविरुध्द बार्शी शहर पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची सुनावणी अतुल कुलकर्णी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे समक्ष होवून, या टोळीस सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये टोळी प्रमुख मोहसिन साबीर तांबोळी, टोळी सदस्य शहाबाज जहाँगीर शेख, इब्राहिम राजअहमद शेख, अखिल इब्राहिम सय्यद (सर्व राहणार बार्शी) यांचा समावेश आहे.
कधी संघटीतरित्या एकत्र येवून तर कधी टोळीचा सदस्य म्हणून स्वतंत्ररित्या गुन्हे करून हे लोक सामाजिक स्वास्थ बिघवडवून दहशत निर्माण करत होते. यापैकी इब्राहिम जहाँगीर शेख यांस यापूर्वी हद्दपार करण्यात आले होते, तसेच इतरांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांच्यात सुधारणा होत नव्हती.
यापैकी कोणी इसम हद्दपार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ संबधीत पोलीस ठाणे व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच भविष्यात देखील दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या इसमांविरोधात अभीलेख तयार करण्यात आले असून त्यांचे विरूध्द प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी केली असून, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोनि बालाजी कुकडे व अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाज केले.
