Gang terrorizing with gunfire arrested; Sensational action by Taluka Police
बार्शी विशेष : किरकोळ कारणावरून एका व्यक्तीवर पिस्टलद्वारे फायरिंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि परिसरात दहशत निर्माण करून पळून गेलेल्या टोळीला बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. मौजे कुसळंब येथे तीन इसमांनी एका व्यक्तीला मारहाण करून गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(१) आणि शस्त्र अधिनियम कलम ३ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके रवाना करण्यात आली होती. आरोपींचा शोध सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने यांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी करमाळा परिसरात वावरत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून योगेश भास्कर मोरे (वय २९, रा. कुसळंब, सध्या रा. हडपसर, पुणे), राहुल दत्ता गायकवाड (वय २६, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, सध्या रा. मांजरी, पुणे) आणि रोशन दत्तात्रय पिसाळ (वय ३२, रा. हडपसर, पुणे) या तिघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हुंदाई ऑरा (Hyundai Aura) चारचाकी गाडी, एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, कोयता, दोन लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके असा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक केलेल्या तिन्ही आरोपींना २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ चे सुमारास अटक करण्यात आली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती रेवती बागडे यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. पवार यांनी युक्तिवाद केला असून, पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.

