कुसळंब येथे तरुणावर जीवघेणा हल्ला आणि पिस्तुलमधून दोनदा गोळीबार

0
Youth Attacked with Rods and Shot at Twice Over Suspicion of Messages
(AI IMAGE)
Youth Attacked with Rods and Shot at Twice Over Suspicion of Messages 


बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे पत्नीला मेसेज केल्याच्या संशयावरून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून, त्यानंतर पिस्तुलमधून दोन वेळा गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी तीन जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब नंदकुमार उकिरडे (वय २४, रा. कुसळंब) हा पोलीस भरतीची तयारी करताना, काही काळापूर्वी त्याच्या ओळखीतील एका तरुणीचे लग्न योगेश भास्कर मोरे याच्याशी झाले होते. लग्नानंतर संबंधित तरुणी बाळासाहेबांना मेसेज करत होती, ज्याचा राग मनात धरून योगेश मोरे याने हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


२६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ चे सुमारास बाळासाहेब घरासमोर पलंगावर विश्रांती घेत असताना आरोपी योगेश मोरे आणि त्याचे दोन साथीदार काळ्या रंगाच्या कारमधून (MH 12 VC 4398) तेथे आले.


योगेशने बाळासाहेबांच्या पायावर आणि हातावर लोखंडी रॉडने भीषण प्रहार केला. जीव वाचवण्यासाठी बाळासाहेब पळू लागल्यानंतर आरोपींनी त्यांच्या दिशेने पिस्तुलमधून दोन वेळा गोळीबार केला. सुदैवाने गोळी चुकल्याने बाळासाहेब शेतात लपून बसले.


आरोपींनी बाळासाहेबांचा भाऊ श्रावण याच्या छातीला पिस्तुल लावून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली आणि गाडीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपी पळून गेले.


घटनेनंतर बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून पुंगळ्या (कारतूस) जप्त केल्या आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) १०९(१), ११८(१), ३५२, ३५१(३), ३(५) आणि शस्त्र अधिनियम कलम ३ व २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या गोळीबाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)