Barshi police arrest accused who has been absconding for 27 years
बार्शी विशेष : खुनाच्या गुन्ह्यातील अपिलात जामिन मिळाल्यापासून २७ वर्षे फरार असलेल्या आरोपीला बार्शी शहर पोलिसांनी अटक केली. विनायक साहेबराव फुरडे. रा. कांदलगाव, सध्या रा. कसबापेठ, बार्शी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भा.दं.सं. कलम ३०२, ३०४(२) अन्वये खुनाचा गु.र.नं. १७|९७ दाखल असलेल्या आरोपीस सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा कारावास आणि २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. तेथे जामीन मंजूर झाल्यानंतर तो न्यायालयात हजर न होता फरार झाला आणि मुंबई, ठाणे परिसरात वास्तव्यास राहिला.
अनेक वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीविषयी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच, जिल्हा पो.अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पो.अधीक्षक प्रीतम यावलकर, उविपो अधिकारी जालिंदर नालकुल, पोनि बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या पथकाने आरोपीस बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथून १३ मे रोजी शिताफीने अटक केली.
सदर कारवाईत सपोनि अजित वरपे, हवालदार बाबासाहेब घाडगे, श्रीमंत खराडे, अमोल माने, संगाप्या मुळे, अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख इसामियों बहिरे यांचा सहभाग होता.