बार्शीत १० लाखाची फसवणूक करणारी टोळी ताब्यात

Admin
0

 

Gang arrested for duping people of Rs 10 lakh in Barshi

Gang arrested for duping people of Rs 10 lakh in Barshi


बार्शी विशेष : बनावट सोन्याची माळ देऊन बार्शीतील दुकानदाराकडून १० लाख रुपये घेऊन पसार झालेल्या राजस्थानी टोळीतील तिघांना बार्शी शहर पोलिसांनी बारामती येथून ताब्यात घेतले. श्रवणकुमार जेठाराम राठोड (वय ४० वर्षे, रा. धानसा ता. भीनमाल जि. जालोर राजस्थान), नंदुकुमार धन्नाराम बाघरी (वय ३७ वर्षे, रा. बागलभिम, ता. भीनमाल जि. जालोर, राजस्थान) व श्रवणकुमार विराराम वाघरी (वय ३१ वर्षे, रा. दहीपुर, ता. राणीवाडा, जि. जालोर, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, आजारपणामुळे पैशांची गरज असल्याचे सांगत ७ जानेवारी रोजी एक महिला व पुरुषाने बार्शीतील स्वप्निल हिरालाल जैन यांच्या वडिलांकडे  एक सोन्याचा मणी व मोबाईल नंबर दिला. पुन्हा ९ जानेवारी रोजी त्या दोघांनी आणखीन दोन मणी दिले. जैन यांनी सोनाराकडून ते मणी तपासून घेतले असता ते सोन्याचे असल्याचे समजले. त्यावर फिर्यादीने १० लाख रुपये देऊन त्या दोघांकडील २ किलो सोन्याची माळ घेतली आणि ते गेल्यानंतर तपासणी केली तेव्हा खोटे सोने दिल्याचे उघडकीस आले.

याबाबत जैन यांच्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करताना सदर फसवणूक केलेल्या व्यक्ती बारामती येथे अशाच प्रकारे गुन्हा करण्यासाठी येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बार्शी पोलिसांनी बारामती बस स्थानकात सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली त्यावेळी त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. याचा अधिक तपास उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.

ही कामगिरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उप विभागिय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर ढोरे, सपोनि बाळासाहेब जाधव, उपनिरिक्षक महेश गळगटे, महिला उपनिरिक्षक सोनम जगताप, बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, हवालदार श्रीमंत खराडे, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, महिला हवालदार शारदा सानप, नाईक संगाप्पा मुळे, शिपाई अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामियाँ बहिरे, रतन जाधव यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)