Barshi taluka police arrest gang for stealing tractors
बार्शी विशेष : बार्शी तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीला अटक करुन, त्यांचेकडून १० ट्रॅक्टरसह ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिग्नेश अंजाबापू आडागळे (वय १९, रा. टाकरवन ता. माजलगांव, जि. बीड), विजय राजू साळवे (वय २४, रा. शेलगांव थडी, ता. माजलगांव, जि. बीड), धीरज बाळू कारके (वय २४ रा. पाथरवाला, ता. अंबड, जि. जालना), प्रदीप उर्फ भगत भगवान तौर (वय २२, रा. शेलगांव थडी, ता. माजलगांव, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दुचाकीवरुन आलेल्या तीन इसमांनी इंद्रेश्वर साखर कारखान्याजवळ ट्रॅक्टर चालकाला अडवले. त्याला चाकूचा धाक दाखवत दोरीने हातपाय व तोंडाला मफलर बांधून आडरानात टाकून दिले आणि त्याचेकडील ट्रॅक्टर, ट्रॉली व मोबाईल चोरुन नेला. सदर घटना १३ जानेवारी रोजी घडली. याबाबत सचिन कृष्णा नवले (वय २९) रा. कांदलगांव, ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करुन बार्शी तालुका पोलिसांनी तीन संशयित आरोपींना बीड जिल्ह्यातील टाकरवन येथून ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन चौकशी केल्यानंतर त्यांनी भगत तौर याचे सांगण्यावरुन गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी भगत तौर यालाही माजलगांव येथून अटक केली. चौकशीमध्ये किशोर शिंपले रा. आंबेवडगांव, ता. धारुर, जि. बीड याने चोरीचे ट्रॅक्टर विकल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी गुन्ह्यातील १० ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रेलर व १ मोबाईल मिळून ५५ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपींनी बार्शी तालुका, टेंभुर्णी, अंबाजोगाई व मुधोळ (जि. बागलकोट, कर्नाटक) या पोलिस ठाणांच्या हद्दीतून चार ट्रॅक्टर चोरल्याचे निष्पन्न झाले असून इतर ६ ट्रॅक्टरबाबत पोलिस माहिती घेत आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उप विभागिय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, बार्शी तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी वळसणे, हवालदार राजेंद्र मंगरुळे, सुभाष सुरवसे, शिपाई राहुल बोंदर, सागर वाकळे, उत्तरेश्वर जाधव, आकाश कांबळे, युवराज गायकवाड, नागनाथ आंधळे व सायबरचे रतन जाधव यांनी केली.