बार्शीच्या संभाजी ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद : आ. अभिजीत पाटील

Admin
0

 

The work of Barshi Sambhaji Brigade is commendable: MLA Abhijit Patil

The work of Barshi Sambhaji Brigade is commendable: MLA Abhijit Patil


बार्शी विशेष : बार्शीच्या संभाजी ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वगार माढ्याचे आ. अभिजीत पाटील यांनी काढले. संभाजी ब्रिगेडच्यावतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

सध्या राज्यात व देशात जातीय व धार्मिक तेढ पसरवणारे लोक आक्रमक झालेले असताना बार्शीतील संभाजी ब्रिगेडची टीम सामाजिक सलोखा राखण्यासाठी 'क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार' सोहळा आयोजित करून शाहू , फुले, आंबेडकरांचा विचार समाजामध्ये रुजवण्याचे काम करत आहे. या टीमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जीवनगौरव पुरस्कार दिल्याबद्दल मी आभारी आहे. हा पुरस्कार नसून पुढील काळासाठी माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे असे मी मानतो. फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने मिळालेल्या आमदारकीचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करण्याचा शब्द मी देतो. पुढील काळात आपण सर्वजण मिळून शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करू असे आ. पाटील यावेळी म्हणाले.

बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कॉम्रेड तानाजी ठोंबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते म्हणून जामगाव येथील आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे चेअरमन डॉ. संदीप तांबारे तसेच प्रगतीशील बागायतदार नवनाथ कस्पटे, पंचायत समिती माजी सभापती लक्ष्मण बापू संकपाळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, अर्णव इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष रवी कापसे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

मागील १४ वर्षापासून संभाजी ब्रिगेड क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत आहे. ज्यावेळी सामाजिक संघटना शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते, त्यावेळी शिक्षकांना देखील आधार वाटतो आणि ते अधिक उत्साहाने ज्ञानदानाचे काम करतात. त्यामुळे या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. आगामी काळात शिक्षकांसोबत तर मी आहेच, पण संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेच्याही पाठीशी उभा राहणार आहे असे मत आ. जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले 

कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आनंद काशीद यांनी संघटनेच्या कार्याची माहिती सांगून, शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे संभाजी ब्रिगेडचे कर्तव्य असल्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा मागील १४ वर्षापासून आयोजित करत असल्याचे सांगितले. भविष्यात देखील शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार बार्शी तालुक्यातील घराघरात पोहोचण्यासाठी संघटना काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद भोंग यांनी तर पुरस्कार वितरणाची प्रस्तावना खंडू डोईफोडे यांनी केली. बालाजी डोईफोडे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष बालाजी डोईफोडे, पांडुरंग घोलप, विक्रम बापू घाईतिडक, मनोज शिंदे, ईश्वर पोकळे, विशाल भुसारे, राम घोडके यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)