The theft of 45 thousand from the sale of agricultural goods
बार्शी विशेष : घराचा कडी कोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सोयाबीन, ज्वारी विक्रीचे ४५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने भरदिवसा चोरुन नेल्याची फिर्याद रामेश्वर रोहिदास जाधव (वय ७३) रा. चिखर्डे, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
२४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराचे सुमारास घराला कुलूप लावून जाधव हे पत्नीसह शेतामध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. मोटरचा स्टार्टर नादुरुस्त झाल्यामुळे दुसरा स्टार्टर आणण्यासाठी तासाभराने ते घरी परतले.
त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. आत जाऊन पाहिल्यानंतर बेडरुम आणि किचनच्या दरवाजांचे कडी कोयंडेही तोडून दोन्ही दरवाजे अर्धवट उघडे दिसले. तसेच बेडरुममधील लोखंडी कपाटाचे दार उचकटलेले, काचा फुटलेल्या आणि आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. सोयाबीन आणि ज्वारी विक्री करुन कपाटात आणून ठेवलेले ४५ हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. कपाटातील सोन्याच्या दागिन्यांबाबत पत्नीकडून माहिती घेऊन कळवितो असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.