बार्शी विशेष : येरमाळा येथील परिचितामार्फत खरेदी केलेल्या स्कूल बसवर ५ लाख ३० हजार रुपयांचा कर थकित असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नोटीस आल्यानंतर समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाली अशी फिर्याद अमर हिरालाल शिलवंत (वय ४६) रा. वाणी प्लॉट, बार्शी यांनी शहर पोलिसात दिली आहे.
जुलै २०२३ मध्ये बार्शीतील खासगी हॉस्पिटलच्या परिसरात शिलवंत यांची येरमाळा येथील ओळखीचे सुहास विलासराव बारकुल यांचेशी भेट झाली होती. त्यावेळी येरमाळा येथील भारती विद्यालयाचे नावे असलेली स्कूल बस (क्र. एमएच-२०-ईजी-२१२३) साडेचौदा लाखास विक्री करायची आहे कोणी ग्राहक आहे का अशी विचारणा बारकुल यांनी केली. त्यावर शिलवंत यांनी स्वतःच बस खरेदी करण्याची तयारी दाखवली.
येरमाळा येथे पैसे घेऊन या आणि गाडी घेऊन जा, असे बारकुल यांनी सांगितल्यावर, ३ जुलै २०२३ रोजी मेव्हण्यासोबत येरमाळा येथे जाऊन शिलवंत यांनी ४ लाख रुपये रोख बारकुल यांना देऊन स्कूल बस ताब्यात घेतली. त्यानंतर शिलवंत, त्यांचे मेहुणे उत्तरेश्वर मुकदम तसेच सुहास विलासराव बारकुल व संजय रघुनाथ बारकुल यांनी धाराशिव न्यायालयाजवळील अॅड. ए. आर. नवले यांचेकडे जाऊन वाहन करारनामा केला. ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. शिलवंत यांनी पत्नीच्या नावाने पाच लाखाचा व स्वतःचे नावाने साडेपाच लाखाचा असे दोन धनादेश सुरक्षा म्हणून बारकुल यांना दिले.
त्यानंतर शिलवंत यांनी २१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत बारकुल यांना वेळोवेळी साडेतीन लाख रुपये रोख स्वरुपात दिले. तसेच बारकुल यांच्या सांगण्याप्रमाणे उर्वरित सात लाख रुपयांपैकी ३ लाख ६२ हजार ९०८ रुपये बारकुल यांच्या एसबीआय खात्यावर व ३ लाख ३७ हजार ९२ रुपये तिरुपती ऑटो विंग्ज प्रा. लि. ओव्हरसीज बँक, पुणे या खात्यावर आरटीजीएस द्वारे पाठविले.
त्यानंतर धाराशिव प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन, त्यावर कोणताही कर प्रलंबित नसल्याची माहिती सुहास बारकुल यांनी देवून सप्टेंबर २०२३ मध्ये धाराशिव प्रादेशिक परिवहन कार्यालयकडून सदर वाहन शिलवंत यांचे नावे केले.
वाहन ताब्यात आल्यानंतर धाराशिव प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे मार्फत सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नोटीस आल्यानंतर सदर स्कूल बसवर ५ लाख ३० हजार रुपयांचा कर थकित असल्याचे शिलवंत यांना समजले. त्याबद्दल बारकुल यांना विचारणा केली असता, मी गाडी विकली असून, त्या स्कूल बसशी माझा काहीएक संबंध नाही. तुमचे तुम्ही बघून घ्या, थकित कराचे पैसे मी देणार नाही असे सांगितले.
आर्थिक फसवणूक झाली असल्याची फिर्याद शिलवंत यांनी दिल्यावरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात भादंसं १८६० कलम ४०६ व ४२० अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.