दिवसाढवळ्या स्कूटीच्या डिकीतून २ लाखांची चोरी

Admin
0

 

Rupees 2 lakhs stolen from the dickey of the scooty in daylight

Rupees 2 lakhs stolen from the dickey of the scooty in daylight 

बार्शी विशेष : शहरातील मध्यवर्ती भागातून स्कूटीच्या डिकीमध्ये ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने भरदिवसा लंपास केली. गुरुवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अ‍ॅडव्होकेट नितेश गणेश सोडळ (वय ४२) रा. मंगळवार पेठ, बार्शी यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

सुलाखे हायस्कूल रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेतून सोडळ यांनी वैयक्तिक कारणासाठी दोन लाख रुपये काढून इलेक्ट्रीक स्कूटीच्या डिकीमध्ये कापडी पिशवीत ठेवले होते. बार्शी नगरपरिषदेसमोरील फॉर्च्युन टॉवरमध्ये असलेल्या त्यांच्या ऑफीसचे खाली दुपारी चारचे सुमारास स्कूटी उभी केली. त्यावेळी एका मित्राची भेट झाल्यामुळे त्याचेसोबत बोलत ते ऑफीसमध्ये गेले. 

दुपारी साडेचारचे सुमारास घरी जाण्यासाठी खाली उभी केलेल्या स्कूटीजवळ ते आले असता, स्कूटीची डिकी अर्धवट उघडी असल्याचे दिसले. त्यामुळे डिकी उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये दोन लाख रुपये ठेवलेली कापडी पिशवी नसल्याचे आणि डिकीचे कुलूप उचकटल्याचे दिसून आले. बार्शी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.


याआधी दहा दिवसांपूर्वी (२८ ऑक्टोबर रोजी) शहराच्या बाजारपेठेतील दाणे गल्ली येथून स्कूटीच्या हूकला अडकवलेली साडेतीन लाख रुपयांची पिशवी चोरट्याने लंपास केली होती. त्या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसतानाच, पुन्हा एकदा चोरट्याने २ लाख रुपये लांबवण्याची घटना घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)