By giving fake D.D. Ex-MP cheated for Rs 70 lakh
बार्शी विशेष : जमीनीच्या व्यवहारातील काही रक्कम देऊन जमीन खरेदी केली आणि राहिलेल्या ७० लाख रुपयांचा बनावट डीडी देऊन आर्थिक फसवणूक केली, अशी फिर्याद माजी खासदार शिवाजीराव विठ्ठलराव कांबळे (वय ७४) रा. जामगांव रोड, बार्शी यांनी बार्शी पोलिसात दिली.
कांबळे यांनी जामगांव येथील त्यांच्या मालकीची शेत जमीन गट क्र.१४७/ब मधील १३१ आर विक्रीस काढल्यानंतर सतीश श्रीमंत आरगडे, रा. तावडी, ता. बार्शी यांनी ती १ कोटी २४ लाख रुपयात घेण्याचे ठरवले व त्यापोटी २४ लाख रुपयांचा एक व २५ लाख रुपयांचा एक असे दोन चेक दिले आणि ५ लाख रुपये कांबळे यांच्या बँक खात्यावर जमा केले. दोन्ही चेक वटल्यावर कांबळे यांना जागेच्या ठरलेल्या किंमतीपैकी ५४ लाख रुपये मिळाले.
आरगडे यांनी राहिलेल्या ७० लाख रुपयांचा फेडरल बँकेचा २१ ऑक्टोबर २०२३ तारखेचा डीमांड ड्राफ्ट सातबारा उताऱ्यावर नाव लावल्यानंतर वटविण्याची अट घालून कांबळे यांना दिला. कांबळेंनी सदर जागेचे खरेदीखत २७ ऑक्टोबर २०२३ रोजी नोंदवून दिले, आणि त्यावरुन सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद लावण्यात आली.
त्यानंतर कांबळे बँकेत डीडी जमा करण्यासाठी गेले त्यावेळी सदरचा डीडी बनावट असल्याचे बँकेकडून सांगण्यात आल्यामुळे फसवणूक झाल्याचे समजले. याबद्दल आरगडे यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी काही दिवस वेळ द्या तुमचे पैसे रोख स्वरुपात असे सांगितले. पण नंतर दहा महिने पैसे मागूनही देण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर कांबळे यांनी डीडी खोटा असल्याचे प्रमाणपत्र बँकेकडून मिळवून, जमिनीच्या व्यवहारातील राहिलेले पैसे न देता बनावट डीडी तयार करुन माझी ७० लाख रुपयांची फसवणूक केली अशी फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.