पोलिस असल्याची बतावणी करुन सोन्याच्या अंगठ्या लुटल्या; बार्शीतील घटना

Admin
0

 

Four gold rings robbed pretending to be a policeman; an incident in Barshi

Four gold rings robbed pretending to be a policeman; an incident in Barshi


बार्शी विशेष : पोलिस असल्याची बतावणी करुन लग्नासाठी निघालेल्या दांपत्याकडील चार सोन्याच्या अंगठ्या भरदिवसा लुटल्याची घटना बार्शीत घडली. जगन्नाथ राजाराम झोडगे (वय ५०) रा. आरणगाव, ता. बार्शी यांनी या घटनेची फिर्याद शहर पोलिसात दिली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी फिर्यादी पत्नीसह मोटरसायकलवरुन तुर्कपिंपरी येथे लग्नाला निघाले होते. सकाळी ११ चे सुमारास बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील हॉटेल श्रीप्रसादजवळून जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या बुलेटवरील ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून, आम्ही एलसीबीचे पोलिस असून पुढे चेकिंग सुरु आहे, तुमच्या अंगावरील सोने काढून ठेवा असे फिर्यादीस सांगितले.


त्याचवेळी समोरुन चालत येणाऱ्या एक इसमाला अडवून त्यालाही अशीच बतावणी करुन सोने काढून ठेवण्यास सांगितले, त्यामुळे त्या इसमाने हातातील दोन अंगठ्या काढून त्या दोघांच्या हातात दिल्या. 


फिर्यादीलाही कागद देऊन त्यामध्ये हातातील अंगठ्या ठेवण्यास सांगितले, त्यावर विश्वास ठेवून दिलेल्या कागदात फिर्यादीने  हातातील चार सोन्याच्या अंगठ्या काढून पुडी बांधून त्या दोघांपैकी एका इसमाच्या हातात दिली. तेव्हा त्या इसमाने फिर्यादीला खिशात ठेवण्यासाठी अंगठ्या असलेली कागदाची पुडी देतेवेळी हातचलाखी करुन ती पुडी बदलून दुसरी पुडी दिली, आणि ते तिघेही तेथून निघून गेले.


नंतर फिर्यादीने ती पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये अंगठ्या दिसून आल्या नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री पटताच फिर्यादीने तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून चार सोन्याच्या अंगठ्या (२०.०४ ग्राम वजनाच्या) चोरीला गेल्याची फिर्याद दिली. 


बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)