Bhagwant Committee felicitates Vijay Thorat
बार्शी विशेष : बार्शीच्या ग्रामदैवतावर केलेल्या भक्तीरचना स्वतःच्या आवाजात स्वरबद्ध करुन त्या भगवंतचरणी अर्पण करणाऱ्या विजय थोरात यांचा सन्मान भगवंत कमिटीच्यावतीने करण्यात आला. भगवंत महोत्सवात बुधवार १५ मे रोजी भगवंत मंदिरात नारदीय कीर्तनाच्या प्रारंभी हा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना बसवराज पुरवंत म्हणाले की, विजय थोरात यांना ईश्वर भक्तीचा वारसा आजोबा, आईपासून मिळाला. घरात असलेल्या भक्तिमय वातावरणामुळे त्यांनी पहिली रचना स्वामी समर्थावर तर दुसरी रचना श्री गणेशावर केली. थोरात यांनी बार्शीच्या भगवंतावर एकूण अठरा रचना केलेल्या असून त्या स्वतःच्या आवाजात स्वरबद्ध केल्या आहेत. अजून सात रचना करुन २५ भक्तीरचनांची छोटीशी पुस्तिका प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. भगवंत मंदिरातील थोरात यांच्या आवाजातील भगवंत नामजप धून वातावरण आणखीनच प्रसन्न करते असेही पुरवंत यांनी सांगितले.
भगवंत महोत्सवाचे औचित्य साधून थोरात यांच्या कार्याबद्दल, भगवंत कमिटीच्यावतीने दादा बुडुख, मुकुंद कुलकर्णी आदी सदस्यांनी त्यांना भगवंत प्रतिमा, पुस्तिका, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल व सन्मान प्राप्त झाल्याबद्दल थोरात यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.