आगामी काळात डिजिटल मिडिया माध्यमाचे भविष्य उज्वल : मनोज पाटील

Admin
0
The future of digital media is bright in the future : Manoj Patil

 The future of digital media is bright in the future: Manoj Patil


बार्शी विशेष (पुणे) : सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता, परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला. पण या दोन्ही माध्यमांना असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता, नव्याने उदयास आलेले डिजिटल मिडिया हे प्रभावी माध्यम असून, वेळेच्या आणि स्थळाच्या सीमा ओलांडत खिशातील मोबाईलवर त्वरित अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मिडिया माध्यमांनी मजल मारली आहे. यातून माहितीची देवाण-घेवाणही काही क्षणातच होत असल्याने, आगामी काळात डिजिटल मिडिया या नव्या माध्यमाचे भविष्य उज्वल असल्याचे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले.  पुणे विभागीय डिजीटल मिडीयाने आयोजित केलेल्या डिजीटल पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने, उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार व संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर उपस्थित होते.


आजच्या काळामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आवश्यक असलेली माहिती काही सेकंदात आपल्या हातातील मोबाईल मध्ये मिळत असली तरी सुद्धा त्याची सत्यता ही निर्मित संस्थेवरती अवलंबून असते. जगात सध्या अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे माहिती थेट मिळत असली तरी सुद्धा, याची अचूक आणि नेमकी माहिती डिजिटल प्रतिनिधींकडेच असते. या नव्या तंत्रज्ञानाचा कायद्याच्या चौकटीत बसून कसा फायदा घ्यायचा याबाबत मनोज पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.


संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी 'डिजिटल माध्यमांचे बदलते स्वरूप अन् डिजिटल मिडीया क्षेत्रात काम करताना तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर विश्लेषण करताना, आगामी काळातील माध्यमांसमोरील आव्हाने आणि या आव्हानातही डिजिटल मिडीयाचे अस्तित्व कसे अबाधित राखायचे? सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जोरावर कोणतीही रचना करता येत असली तरी त्यामध्ये कोणती काळजी घ्यायची याबाबत सखोल विश्लेषण केले. तसेच नव्या आव्हानांना सामोरे जाताना संगणकाचा या डिजिटल माध्यमातून कसा फायदा होत आहे आणि यातून नक्की काय साध्य करता येईल याबद्दलही विश्लेषण केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा माने यांनी अनुभवाच्या जोरावर बदलत्या आव्हानांना कसे सामोरे जायचे याबाबत मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या भडिमारामध्ये आपल्या डिजिटल माध्यमांची विशेष पकड आणि वेगळेपण हेच आगामी काळात या आव्हानांना सामोरे जाण्यास ताकद दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगत, विविध विषयावर डिजिटल माध्यमांनी आपली मते व्यक्त करण्याचे आवाहन केले. कायदे आणि तंत्रज्ञान ही डिजिटल मिडीयासाठी कायमच हातामध्ये हात घालून जाणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन करुन पुणे शहर विभागाच्यावतीने ही अनोखी संधी निर्माण केल्यामुळे तंत्रज्ञान आणि कायदे या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. डिजिटल मिडीयात वेळेची तारेवरची कसरत साधताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या पत्रकारांनी कोणती काळजी घ्यावी याविषयीही माहिती दिली.


कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात नंदकुमार सुतार (संपादक) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान डिजिटल माध्यमांसाठी कसे वरदायीनी आहे? हे स्पष्ट करण्यासाठी विस्तृत विवेचन केले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार विदेशात नित्य वापरले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान हे डिजिटल मिडीयासाठी किती फायदेशीर आहे याची माहिती सांगून, याचा उपयोग करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे याविषयीही मार्गदर्शन केले. 


माध्यमतज्ञ चंद्रकांत भुजबळ यांनी डिजिटल माध्यमांसाठी उपलब्ध कायदे आणि डिजिटल माध्यमांची विश्वासार्हता याबाबत मार्गदर्शन केले तर विधीज्ञ अतुल पाटील यांनीही माध्यमांसाठी आचारसंहिता आणि कायदे याबद्दल सखोल विश्लेषण केले. 


कार्यशाळेचे आयोजन माऊली म्हेत्रे (राज्य संघटक), महेश टेळे-पाटील (अध्यक्ष पुणे शहर), हर्षद कोठावडे (कार्याध्यक्ष पुणे शहर), धनराज माने (कार्याध्यक्ष पुणे शहर), केतन महामुनी (सहसचिव) यांनी केले होते. यावेळी सतीश सावंत (उपाध्यक्ष), विकास भोसले (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), महेश कुगांवकर (सचिव), संजय कदम (राज्य संघटक), शरद लोणकर, अमोल पाटील, तेजस राऊत, गणेश बोतालजी (सातारा जिल्हा अध्यक्ष), अजिंक्य स्वामी (पुणे जिल्हा अध्यक्ष), विकास शिंदे (पिंपरी-चिंचवड अध्यक्ष), गणेश हुंबे यांच्यासह डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)