The woman who tried to steal abused the shopkeeper
बार्शी विशेष : चोरीचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडल्यानंतर एक महिला व तीन इसमांनी दुकानदारालाच उलट शिवीगाळी केल्याचा प्रकार बार्शीतील भांडे गल्लीत घडला. अमोल विनायक शाहिर (वय ४४) रा. सुभाषनगर बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात या प्रकाराबाबत तक्रार दिली आहे.
शहरातील महावीर मार्ग भांडे गल्लीत अमोल यांचे शाहीर किचन मार्ट दुकान असून, २६ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुकानात आलेल्या एका महिलेने व सोबतच्या इतर तिघांनी भांडे दाखविण्यास सांगितले. भांडे दाखवत असताना ती महिला दुकानातील चार टिफीन तिच्याकडील पिशवीत टाकून निघून जात असल्याचे दुकानातील कामगाराने पाहिले व मालकांना सांगितले.
त्यावेळी त्या दोघांनी महिलेला अडवून तिच्याकडील पिशवी तपासली असता, त्यामध्ये स्टीलचे चार टिफीन मिळून आले. तिला नाव गाव विचारल्यावर शशीकला कांतीलाल पवार रा. सावदरवाडी, ता. परांडा असल्याचे सांगितले, व आम्हाला न विचारता टिफीन पिशवीत का टाकले असे विचारताच ती महिला व इतर तीन अनोळखी लोक शिवीगाळी करत निघून गेले, अशी तक्रार शाहीर दिली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा नोंदविला आहे.