शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १६ महिलांविरोधात गुन्हा दाखल

Admin
0

 

The case against 16 women for cheating the government

The case against 16 women for cheating the government

बार्शी विशेष : महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना कर्जपुरवठा करणाऱ्या राज्य शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजनेतून, वैयक्तीक फायद्यासाठी लाखो रुपयांची रक्कम उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १६ महिलांविरोधात बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


स्वयं सहायता समूहाला (बचत गट) कर्जपुरवठा करुन, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत फक्त बचत गटालाच कर्ज घेण्याची तरतूद आहे. असे असतानाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन, वैयक्तीक फायद्यासाठी लाखो रुपयांची रक्कम उचलून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


एका स्वयं सहायता समूहात (बचत गटात) १० ते २० महिला असतात व १० ते २० स्वयं सहायता समूहांचा एक ग्रामसंघ तयार केला जातो. यातून एक अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्षांची नेमणूक करुन ग्रामसंघाच्या राष्ट्रीय बँकेतील खात्याच्या व्यवहाराचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. 


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बार्शी तालुक्यातील मौजे उंडेगाव, देवगाव, गाताची वाडी, लक्ष्याची वाडी, नागोबाची वाडी व शेलगाव व्हळे या गावात स्थापन केलेल्या ग्रामसंघाच्या १) सविता मोहन गिरी, २) सुरेखा दशरथ कुऱ्हाडे, ३) जयश्री राजाराम चौगुले, ४) सुनिता दयावंत जगताप, ५) संगिता युवराज गिरी (सर्व रा. उंडेगाव, ता. बार्शी) ६) वंदना गोपाळ चव्हाण, ७) संगिता त्र्यंबक मस्तूद, ८) राणी वसंत कदम, ९) अश्विनी हनुमंत मांजरे, १०) अंजना त्र्यंबक मस्तूद, ११) अपर्णा भगवान मांजरे, १२) अनिता नंदू मांजरे (सर्व रा. देवगाव, ता. बार्शी) १३) कुसूम दत्तात्रय गव्हाणे रा. गाताची वाडी, ता. बार्शी १४) सरस्वती दादा पायघण, व १५) मनिषा सूरज देवकते (रा. नागोबाची वाडी, ता. बार्शी) १६) भारती जालिंदर शिंदे (रा. लक्ष्याची वाडी, ता. बार्शी) या महिला सदस्यांनी वैयक्तिक कर्ज घेण्याची तरतूद नसतानाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन, दि. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत सदर योजनेतून एकूण १८ लाख १२ हजार रुपयांची रक्कम बेकायदेशीररित्या उचलून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे ग्रामसंघांचे लेखापरिक्षणातून निदर्शनास आले.


त्यासंदर्भात त्यांना पत्र व नोटीस पाठवून तसेच तोंडी सूचना देऊनही अद्यापपर्यंत त्यांनी सदर रक्कम परत न भरता शासनाची फसवणूक केली असल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालकांच्या आदेशान्वये, या योजनेचे बार्शी तालुका अभियान व्यवस्थापक गणेश काकासाहेब पाटील (रा. पानगाव, ता. बार्शी) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली असून, बार्शी तालुका पोलिस ठाण्यात १६ महिलांविरोधात भादंवि १८६० कलम ३४, ४०६ व ४२० नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक भालेराव करत आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)