The city police arrested the women thieves along with the goods
बार्शी विशेष : संक्रात सणानिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कमेवर हात मारणाऱ्या तीन चोरट्या महिलांना बार्शी शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी भगवंत मंदिर परिसरात मकर संक्रात सणानिमित्ताने महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याचा फायदा घेत महिला चोरट्यांनी काही महिलांच्या पर्समधील दागिने, मोबाईल आणि रोख रक्कमेवर हात मारला. यात रुपाली सोमनाथ ढवळे रा. मंगळवार पेठ, बार्शी यांचे पर्समधील ६ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, अंजली गणेश साखरे रा. सुभाषनगर, बार्शी यांचेकडील सॅमसंग मोबाईल, नितल अतुल माने रा. उपळाई रोड, बार्शी यांचेकडील रेडमी मोबाईल आणि अनिता मारुती माने, कथले प्लॉट, बार्शी यांचेकडील रोख १७०० रुपयांचा समावेश होता.
याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरु केला तेव्हा चोरी करणाऱ्या तीन महिला बार्शी बस स्थानकातून बस बाहेर जाणाऱ्या गेटच्या आडोश्याला लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांचेकडून चोरीस गेलेला ३८ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांना अटक केली. अश्विनी बाबा शिंदे (वय ५०) चंदाबाई उत्तम शिंदे (वय ४३) व आक्काबाई भावड्या शिंदे (वय ५०) सर्व रा. भोकनवाडी, ता. कळंब जि. धाराशिव अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
सदर कामगिरी पो.अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पो.अधिक्षक प्रीतम यावलकर, उ.वि.पो. अधिकारी जालिंदर नालकुल, पो.नि. संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर उदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि दिलीप ढेरे, पोउनि महेश गळगटे, पोहेकॉ रियाज शेख, शैलेश चौगुले, पोना मनिष पवार, पोकॉ सचिन नितनाथ, सचिन देशमुख, रोहित बागल, अंकुश जाधव, शरद वाघमोडे, प्रल्हाद अकुलवार, अविनाश पवार, राहुल उदार, धनराज फत्तेपुरे, मोहन कदम सचिन अंकुश तसेच सायबर विभागाचे रतन जाधव यांनी केली.
