Republic Day celebrated with enthusiasm in Barshi
बार्शी विशेष : बार्शी शहर व तालुक्यात ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकारी व खासगी क्षेत्रातील विविध संस्थांमधून ध्वजारोहण करण्यात आले. बार्शीतील भगवंत मैदानावर झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिन समारंभात बार्शीचे तहसिलदार एफ. आर. शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सशस्त्र पोलिस दल व गृहरक्षक दलाच्या पथकांनी तसेच श्री शिवाजी महाविद्यालय, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, न.पा. शाळा क्र. १२, अँग्लो उर्दू हायस्कूल, न्यू हायस्कूल, अभिनव विद्यालय, महाराष्ट्र विद्यालय, मॉडेल हायस्कूल, हि. ने. न. कन्या प्रशाला येथील मुला-मुलींच्या पथकांनी शिस्तबध्द संचलन करुन मानवंदना दिली. मतदान जनजागृती रथ, अग्निशमन दल व आरोग्य विभागाच्या वाहनांनीही संचलनात भाग घेतला होता. विविध प्रशालेतील मुला-मुलींनी सादर केलेल्या कवायतीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषके देऊन, खाऊ वाटप करण्यात आले.
समारंभास मा. खासदार शिवाजी कांबळे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, शहर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, अप्पर तहसिलदार वृषाली केसकर, नायब तहसिलदार एस. व्ही. बदे व एस. एम. मुंढे, प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे, वीरमाता, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, तहसिल कर्मचारी वृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले.