Jewellery worth 2 lakh stolen from doctor's house
बार्शी विशेष : रात्री जेवण करुन डॉक्टरांचे कुटुंब झोपी गेल्यानंतर चोरांनी कडी-कोयंडा तोडून घरातील दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरमालकांनी फोन करुन सांगितल्यानंतर त्यांना ही घटना समजली.
बार्शीतील नर्गीस दत्त मेमोरिअल कॅन्सर हॉस्पीटलमध्ये सेवेत असलेले डॉ. अभिनव अशोक इंगळे (वय ३७) लक्ष्मीनगरमधील राजू मालू यांच्या येथे मागील एक वर्षापासून भाड्याने राहात आहेत. ४ जानेवारीच्या रात्री साडेनऊचे सुमारास कुटुंबीयांसह जेवण करुन ते झोपी गेले होते. ५ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घरमालक मालू यांनी, तुमच्या गेटसमोर बॅग, कपडे आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना फोन करुन सांगितले.
त्यावेळी त्यांनी घराबाहेर जाऊन पाहिले असता घरातील सामान, बॅग बाहेर पडल्याचे आणि बाहेरील लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तुटला असल्याचे दिसले. घरातील दुसऱ्या बेडरुममध्ये जाऊन बघितले असता, तेथील कपाट अर्धवट उघडे होते आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे लॉकेट, मिनी गंठण, ३ अंगठ्या, कानातील ४ टॉप्स, मनगटे, चांदीचे २ जोड पैंजण, मंगळसूत्र आणि ५०० रुपयांच्या १० नोटा असा १ लाख ९९ हजार २८ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.
डॉ. इंगळे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सपोफौ वरपे करत आहेत
