पोलिस असल्याची बतावणी करुन भरदिवसा सोन्याचे दागिने लुबाडले

Admin
0

 

Pretending to be a policeman, they looted gold ornaments during the day

Pretending to be a policeman, they looted gold ornaments during the day 

बार्शी विशेष : पोलिस असल्याची बतावणी करुन दोन इसमांनी घराकडे चाललेल्या वृध्द सेवानिवृत्त शिक्षकाकडील २० ग्रॅम सोन्याचे दागिने भरदिवसा लुबाडल्याचा प्रकार कासारवाडी रस्त्यावरील सिध्देश्वरनगरजवळ घडला. महेश सहदेव कांबळे (वय ६४) रा. समर्थ कॉलनी, कासारवाडी रोड, बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

सेवानिवृत्त शिक्षक असलेले कांबळे ५ जानेवारी रोजी दुपारी पावणे बाराच्या सुमारास भाजी मंडईकडून घराकडे निघाले असताना, कासारवाडी रस्त्यावरील सिध्देश्वरनगरच्या पुढे आल्यानंतर एका ३५ ते ४० वयाच्या इसमाने त्यांना थांबवून तानाजी शिंदे कुठे राहतात असे विचारले. त्यावर कांबळे यांनी माहिती नाही असे सांगताच, आमचे साहेब पुढे थांबलेले आहेत ते काय म्हणतात ते ऐका असे सांगून त्या इसमाने त्यांना काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर (नंबर माहीत नाही) बसलेल्या दुसऱ्या इसमाकडे नेले.

मोटरसायकलवर बसलेल्या इसमाने त्यांना पोलीस अधिकारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले, आणि बार्शी तालुक्यात चाकूने वार केलेले आहेत, वातावरण फार तंग आहे, तुम्ही एकटे का फिरता, तुमच्याकडील सोन्याचे लॉकेट आणि अंगठी द्या आम्ही व्यवस्थित पुडी बांधून देतो असे म्हणून दागिने मागितले. आणि कांबळे यांनी दिलेली सोन्याची अंगठी आणि लॉकेट पुडीत बांधल्याचे नाटक करुन एक कागदाची पुडी त्यांच्या हातात दिली, आणि ते दोघे कुर्डुवाडी रस्त्याच्या दिशेने मोटरसायकल वरुन निघून गेले. 

ते दोघे गेल्यानंतर कांबळेंनी दिलेली कागदाची पुडी उघडून बघितली असता, पुडीत एक लहान दगड दिसून आला. त्यावरुन त्या दोन इसमांनी हातचलाखी करुन लुबाडल्याचे त्यांच्या लक्षात आले. १५ ग्रॅमचे लॉकेट आणि ५ ग्रॅमची अंगठी असे २० ग्रॅम सोन्याचे दागिने फसवून लुबाडून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास महिला सपोफौ जाधव करत आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)