Citizens should cooperate with Maratha society and open category survey: Tehsildar Sheikh
बार्शी विशेष : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बार्शीचे तहसिलदार तथा नोडल अधिकारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग एफ. आर. शेख यांनी केले.
बार्शी तालुक्याची लोकसंख्या सुमारे साडेचार लाख असून, सात दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करायचे असल्यामुळे सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे सर्वेक्षण केले जाईल. राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर असलेले हे कर्मचारी आजपासून घरोघरी जाऊन कुणाच्याही प्रतिष्ठेला, सामाजिक स्तराला हानी पोहोचणार नाही अशा पध्दतीने जवळपास १८० प्रश्न विचारतील, त्यासाठी नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन तहसिल कार्यालयात आयोजित केलेल्य पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केले
- गोखले इन्स्टिट्यूट यांनी विकसीत केलेल्या मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन पध्दतीने केले जाणार सर्वेक्षण
- राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व तालुक्यात नोडल अधिकारी म्हणून शहरी भागासाठी मुख्याधिकारी तर ग्रामीण भागासाठी तहसीलदार यांची नेमणूक
- सर्वेक्षणासाठी बार्शी तालुक्यात ९७७ पर्यवेक्षक आणि प्रगणकांची नियुक्ती
- प्रगणक व पर्यवेक्षकात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल यांचा समावेश
- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चार अधिकाऱ्यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती
- २० जानेवारी रोजी गोखले इन्स्टिट्यूटकडून तालुक्यातील मास्टर ट्रेनर्सचे जिल्हास्तरावरीय प्रशिक्षण पूर्ण
- २१ आणि २२ जानेवारी रोजी चार मास्टर ट्रेनर मार्फत तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण
- प्रत्येक प्रगणकांकडे सुमारे १०० ते १५० कुटुंबाच्या सर्वेक्षणाचे काम
- २०११ ची जनगणना अधारभूत मानून गावांमध्ये प्रगणकांची, पर्यवेक्षकांची नियुक्ती
- प्रामुख्याने खुल्या समाजासाठी आणि मराठा समाजासाठी हे सर्वेक्षण असल्यामुळे मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय समाजाला नाव आणि जात विचारल्यानंतर सर्वेक्षण बंद होईल
- कुटुंबाच्या प्रमुखांनी सांगितलेली माहितीचीच नोंद करण्याच्या प्रगणकांना सक्त सूचना नागरिकांनाही नोंदीबाबत खात्री करण्याचे आवाहन
- सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी अपलोड करण्याची अॅपमध्ये सुविधा
