Theft of 65 kg of copper pots from a factory in Barshi
बार्शी विशेष : शहरात असलेल्या भांड्यांच्या कारखान्यातून ६५ किलो तांबे धातूची भांडी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. प्रदीप येवनकर यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शहरातील आशा टॉकीज जवळ प्रदीप प्रभाकर येवनकर (वय ६२) रा. कुर्डुवाडी रोड, बार्शी यांचा प्रदीप आर्यन फॅक्टरी नावाने भांडी दुरुस्ती व पॉलीश करुन देण्याचा कारखाना आहे.
बार्शी शहरातील एका भांडे व्यापाऱ्याने १३ डिसेंबर रोजी त्यांच्याकडे ४० गडवे, ४० तांबे, ४० ताटे आणि २० कळश्या याप्रमाणे ६५ किलो वजनाची तांब्याच्या धातूची भांडी पॉलीश करण्यासाठी दिली होती. त्यापैकी काही भांड्यांना पॉलीश झाले होते व काहींचे काम बाकी होते.
येवनकर यांनी १४ डिसेंबर रात्री ९ वाजेपर्यंत भांड्यांना पॉलीश करण्याचे काम केले, आणि कारखान्याचा आतील दरवाजा पुढे करुन व मुख्य दरवाजाला कुलूप लावून ते घरी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे कारखान्यात गेल्यानंतर, आतमध्ये पॉलीश करण्यासाठी आलेली भांडी त्यांना दिसून आली नाहीत, आणि आसपास शोध घेऊनही सापडली नाहीत. यावरुन कारखान्याच्या आतील उघड्या दरवाजातून कोणीतरी भांडी चोरुन नेल्याची त्यांची खात्री झाली.
येवनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोना ठेंगल करत आहेत.
