68 thousand stolen by breaking the lock of the house
बार्शी विशेष : सोयाबीन विकून आलेल्या ६८ हजार रुपयावर घराचे कुलूप तोडून चोराने डल्ला मारल्याची घटना बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी येथे घडली. याबाबत विकास भिष्माचार्य डोळे (वय ४७) रा. ढेंबरेवाडी, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ज्वारी खुरपण्याचे काम असल्याने आई, वडिल, पत्नी मुलांसह ते घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लाऊन सकाळी १० च्या सुमारास शेतामध्ये गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास वडिलांनी आणि पत्नीने घरी जाऊन जेवणाचा डबा आणला त्यावेळीही परत येताना त्यांनी दरवाजाला कुलूप लावले होते.
त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास वडिल एकटेच घरी गेले, तेव्हा घराला कुलूप नसून दरवाजा उघडा असल्याचे दिसताच त्यांनी लगेच मुलाला फोन करुन सांगितले. त्यामुळे विकास यांच्यासह सगळेजण शेतातून घरी गेले, त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप सोफ्यावर तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. आत रुम मध्ये जाऊन पाहिले असता, लोखंडी कपाट उघडे असल्याचे आणि त्यामधील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. आणि चार पाच दिवसापूर्वी सोयाबीन विकून आलेले कपाटात ठेवलेल्या २०० रुपयांच्या ३२४ नोटा याप्रमाणे ६८ हजार ४०० रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २.३० च्या दरम्यान ही घटना घडली.
विकास डोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पांगरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
