Lady thieves flee after snatching gold garlands at Barshi bus stand
बार्शी विशेष : महिला प्रवाश्यांच्या गळ्यातील सोन्याच्या माळा जबरदस्ताने खेचून चोरट्या महिला पसार झाल्याच्या दोन घटना बार्शी शहर बस स्थानकावर घडल्या. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत तीन महिलांनी धक्काबुक्की करुन ४ ग्रॅम सोन्याच्या मण्याची माळ चोरल्याची तक्रार चित्राताई सुधाकर जाधव (वय ६०) रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
बार्शीतून दुकानासाठी चुडे खरेदी केल्यानंतर त्या नातवासोबत परत गावाकडे जाण्यासाठी बार्शीच्या बस स्थानकावर आल्या तेव्हा अतिशय गर्दी होती. त्या गर्दीतून बीडच्या बसमध्ये चढत असताना पाठीमागून एका महिलेने त्यांना जोराचा धक्का दिला. हातातील पिशवी सांभाळत असतानाच त्या महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मण्याची माळ जबरदस्तीने खेचली. त्यामुळे त्यांनी गळ्यावर हात धरला, तेव्हा दुसऱ्या महिलेने जोरात धक्का दिल्यामुळे गळ्यावरील हात ढिला झाला. त्याचवेळी तिसऱ्या महिलेने बसच्या पायऱ्यावरुन त्यांना वर ढकलल्यामुळे तोल सांभाळत असताना, पाठीमागील महिलेने गळ्यातील माळ खेचली आणि त्या तीन महिला गर्दीचा फायदा घेवून पसार झाल्या. आरडाओरडा करुनही गर्दीमुळे कुणी आवाज ऐकला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ चे सुमारास घडली.
याचप्रकारे केशरबाई जालिंदर लोंढे (वय ६०) रा. मळेगाव, ता. बार्शी यांच्याही गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात महिलांनी जबरदस्तीने तोडून नेल्याचे समजले असेही फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी तीन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
बार्शी शहर पोलिसांनी या घटनेचा त्वरित तपास करुन बसंती सुब्राम उपाध्ये, शोभा अमित उपाध्ये (दोघी रा. लाळे, ता. जळकोट, जि. लातूर) व हौसाबाई नामदेव कांबळे रा. विलासनगर, ता. जि. लातूर या तीन महिलांना पोलिसांनी मुद्देमलासह अटक केली असून, मा. न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
